Chehra

Short stories form Dr. Murlidhar Bhawsar !

Wednesday, 13 February 2013

शब्द शक्ती !

शब्द शक्ती !

पंचवीस तीस पेशंट, अडीच तीन तास, डॉक्टरचा कंटाळलेला जीव. घरी निघावं, अनु वाट पहात असेल ? 
डॉक्टर माधव ला हाक मारतो, माधव येतो आंत दरवाजा लोटून.
शब्द शक्ती !
"कुणी पेशंट आहे कारे ?"
"नाही साहेब !" 
:हे बघ तू बंद करून जा !" डॉक्टर आपली आवरा आवर करू लागतो, बाहेर पेशंटची चाहूल.
"साहेब पेशंट आहे." माधव म्हणतो . नाराज झालेला डॉक्टर, 
"बर पाठव आंत" माधव बाहेर, दार लोटून एक वृद्धसे गृहस्थ आंत येतात. 
"ये बेटा आंत ये !" तिचा हात धरून ते तिलाही आंत घेतात. ती असेल वीस वर्षाची, गोल चेहरा, गोरी त्वचा, नाजुकशी, गोड वाटणारी, डोळे छान ...... काहीसे तपकिरी, कशालातरी घाबरणारे. ती खूप निस्तेज, पण कधी काळी तेजस्वी असावी.
डॉक्टर चेहऱ्यावर नेहमीच हसू पांघरतो.
"बसा ...... बैस," ती बसते खाली मान घालून, ते गृहस्थ कागदाच एक पुडकं डॉक्टर समोर ठेवतात . 
डॉक्टर ते पहातो, गृहस्थ बोलत असतात. 
"जो त्रास होतो तो नेहमी तोच नसतो. दरवेळी वेगवेगळा, आधी दोन मानसोपचार तज्ञ डॉक्टरांना दाखवलं. निरनिराळी रोगांची नांव सांगतात. औषध मात्र बरीचशी तीच तीच असतात.फरक काहीही नसतो.
"हं ...... चल !"  डॉक्टरच्या शब्दाचा अभिप्रेत अर्थ घेवून ती पेशंट टेबल कडे जाते, झोपते.  डॉक्टर तिला तपासत गोड आवाजात 
"बोल..... काय होतंय तुला ?" ती अबोल.
"अग, तू बोलणार नाहीस तर मग मला कळणार कसं ?" आणि मला कळणार नाही मग तू बरी कशी होणार ? "
"मला नाही आठवत !" तिचा आवाज तिच्या चेहर्या इतकाच आकर्षक पण बोलण्याची ईच्छा नसलेला. 
"केव्हा आठवेल ?" 
"नेहमी नाही आठवत, आठवत कधी कधी आणि मग त्रास व्हायला लागतो. त्यापेक्षा नकोच आठवायला."
"हं ...... काय त्रास होतो ?" 
"सांगितलं ना, आठवत नाही म्हणून !" 
"तुला बर व्हायचंय ना ? पुन्हा हसायचं ना ?"  डॉक्टरचे गोड हसरे टिकाऊ शब्द. ती पहात असते समोरच्या फ्लॉवर पॉट मधील फुलांकडे एकटक. ती फुल तिच्या डोळ्यातून खोल अंतरंगात उतरल्या सारखी.
" डॉक्टर या फुलांना सुगंध मिळेल का हो ?" ती बोलून जाते फुलंच दु:ख स्वत:च्या दु:खा सारख.
"मिळेल ना, त्यावर थोडा परफ्युम स्प्रे केला कि मिळेल त्यातून सुगंध.!"  डॉक्टर स्वर:च दिलखुलास हसतो. ती मात्र शून्य असते आणि बोलत जाते शुन्यातल्या विश्वात हरवल्या सारखी.
"मला जगायचंय, कारण मला मरण्याची तीव्र ईच्छा  होत नाहीये.मला झोपायचं सुद्धा नाहीये.झोपण म्हणजे तेव्हढ्या वेळेपुरत मरणच.असत ते ! तुमची औषध झोपवतात मला....... तुम्ही मला बर करणार ? "  डॉक्टर प्रश्न चिन्हात बांधल्या सारखा हो म्हणतो. 
"मला जो त्रास होतो तो मी लिहून ठेवलाय तुम्ही वाचा.!" 
"हे बघ, पाच मिनिटात मी तुला तपासेन, तुला आठवेल तास सांग.मी औषध लिहून देईन. .........  डॉक्टरला घाई झालेली. ती गप्प, नर्व्हस,  डॉक्टर गोंधळत जातो. गृहस्थ बोलू लागतात. 
''खरय, तुम्ही वाचून पहा ते. ते वाचून दोन  दिवसांनी तिला घेवून येईन. 
  डॉक्टर खुर्चीत, डोक्यातला कंटाळा चेहऱ्यावर दाखवता येत नाही त्याला. गृहस्थ ती वही समोर ठेवतो. नाईलाज झाल्या  सारखा डॉक्टर ती घेतो. गृहस्थ फ़ी च्या नोटा पुढे करतो, तसा   डॉक्टरच्या डोक्यातला कंटाळा बराचसा पसरट हसतो. गृहस्थ व ती दोघे जातात.   डॉक्टरही ताडकन घरी पोहचतो.  डॉक्टरची बायको अनु छान स्वयंपाक करते.
दोघाचं जेवण होत आणि मग वेळ होते जवळ जवळ झोपण्याची, अनु दिवाळी अंकातल्या कथेत रंगलेली,  डॉक्टर फेकायला सांगतो तो अंक. ती नाही ऐकत. सहज  डॉक्टरला आठवत सायंकाळ च्या पेशंटची वही.  डॉक्टर वही काढतो. पाहिलं पान-
 "मी लिहितेय, मला आठवेल तसं,
मला बर वाटत नाही असं सगळे म्हणतात,
  मला काय होतंय ते मात्र कलर नाही. 
  पण मला असं वाटत मला काहीतरी भास होत असतात.
   ते भास होत असतात तेव्हा अतिशय खरे वाटतात.
   मी बसलेली असते माझ्याच शेजारी,
   मला वाटत कविता करावी छानशी,
   मी सुंदरश्या फुलांना डोळ्या समोर आणण्याचा प्रयत्न करते.
   माझ्या भोवताली मोहरून येतो गुलाबांचा बगिच्या, सुगंधी गुलाब,
   लाल पिवळा पांढरा गुलाब आणि मिश्र रंगांचेही  गुलाब, कितीतरी रंग असतात त्यांचे.
   किती सुगंध दाटतो खोलीत, 
    त्या सुगंधाचा अभिमान वाटतो मला, माझी मान स्वाभिमानान ताठ होते. 
   गर्वान वर जाते. 
   ……… तेव्हा मला दिसतो छताला लोंबकळणारा बल्ब ! 
    किती तापलय तो ! मी एक सारखी पाहतेय त्याला, बल्ब च्या आंत पेटलेली तार ! 
    ती तार जाड होतेय आणि लांब सुद्धा, ती तार हलतेय,
    वळवळतेय एखाद्या पेटलेल्या नागिनी सारखी. 
    ते तीव्र किरण सहन होत नाहीत  माझ्या डोळ्यांना.
     डबडबलेत डोळे माझे, 
      ती नागीण  आहे लोखंडाच्या रसाची आग. 
      माझ्या भोवतालचे सगळे गुलाब जळताहेत ! ……मी वाचवू पाहतेय त्यांना !
       पण सगळ्या सुगंधाचा धूर धूर झालाय. 
      माझ्या नाकातोंडात शिरतोय तो धूर. 
      मला ओरडायच आहे ……………………… मला ओरडायलाच हवं आहे. 
       ओरडण्याशिवाय काही पर्यायच नाहीये - ……………………. 
        पण …. पण माझा आवाज कुठे गेलाय ? 
        कुठं गेलाय माझा आवाज ?     
       डबडबल्या डोळ्यांनी दिसत मला, 
       त्या पेटलेल्या नागिणीच्या गळ्यात जावून बसलाय माझा आवाज. 
       आणि मी ?
      अबोल………………  मुकी …… माझे गुलाब जळताहेत तरी ? 
      मी फुफ्फुसात खूप हवा भरून घेण्याचा प्रयत्न करते. पण हवा नाहीच कुठे ! 
      धूर आहे सगळीकडे पाकळ्यांचा ! माझ्या शरीराला कंप ! 
      नागीण हसतेय ! 
      किती घाम निघतोय माझ्या अंगागातून, चिंब भिजलेय मी, 
       घाम वाहतोय एकसारखा …………विझवून टाकतो गुलाबांचा कोळसा. 
       माझ्या शरीराचा घाम घाम होतोय. 
       मी कोसळून पडते …… खाली …। कोळश्याच्या चिखलात !
       खोल खोल रुतून पडते मी त्यात- "  डॉक्टर हसू लागतो.                       
    "काय हो काय झाल ?…. का हसताय ? अनु विचारते.
    " अग तुझ्या वाचण्या सारख आहे बघ, मला तर तुझ्या सिरियल्स सारख वाटतंय."
    " काय आहे ते ?"
    " व्यथा आहे माझ्या पेशंटची."  डॉक्टर सायंकाळची गंमत सांगतो.
    " आश्चर्यच आहे. "
    " नाहीतर काय ?"
    "आश्चर्य तीच नाही तुमच, पेशंट त्याची व्यथा सांगतोय, थोड्या थोडक्या नाहीत तर चांगल्या
      वही भरून आणि तुम्ही हसताय ?
    " तू वाचून पहा, तू हि हसशील !"
    " नाहीहो मला तुमच्या पेशांतच तोंडही पाहायला आवडत नाही. आणि इतक्या कम्प्लेंट
      असतील तर सोडून दे तो पेशंट."
    " अग वाच तर… …. पण जर मोठ्यान," अनु वाचू लागते.
      " आणि शुद्धीवर येते तेव्हा काहीच आठवत नाही.
      सगळे विचारतात मला, विचारून विचारून थकतात.
    मी आठवून आठवून थकते.
    पडलेली असते टेबलावर मान टाकून,
    समोर कोरे कागद असतात, एक शब्द लिहावासा वाटत नाही.
    आणि जाणवू लागत, दोन दिवसापूर्वी मी कोळश्याच्या चिखलात फसले होते.
    पेटलेल्या नागिणीनं ओकलेल्या आगीत……  जळलेल्या गुलाबांचा कोळसा,
    माझ्या घामानं भिजून झालेला चिखल,
    सुकून गेला तो चिखल, उडून गेला धूळ होवुन.
    मी मात्र काळी कुट्ट झालेय.
    माझ्या भोवताली चार भिंती असतात.
    त्या भिंती एकदम सोन्याच्या होतात, लकाकतात.
    मी मात्र कोलाश्याची, कुट्ट काळी.
    डोक्यावरच छत मोठ्या हिऱ्या सारखं चमकायला लागत.
    तो प्रचंड हिरा वर वर जातोय …………। आभाळात.
    चारही भिंती माझ्या पासून दूर दूर पळताहेत आणि माझ्या भोवती उरत
    एक अजस्र जंगल.
    नाही मला भिंती हव्या आहेत, मला घर हवंय,
    मला माझ घर हवंय ! मला धावायचं असत भिंतींना पकडण्या साठी.
    पण एकाच वेळी चारही दिशांना नाही पळतायेत मला.
    आणि वर उडताही येत नाही.
    मी लुळी होवून वळवळते अजगर सारखी. कुणीतरी धरतंय मला ?
    मला दाबून ठेवलय. ……।  कुणीतरी ?
   डॉक्टर झोपला, अनु वाचत जाते.
   शब्द काहीतरी नात जुळवत असतात एका  अंतरंगाची दुसऱ्या अंतरंगाशी !
   " सगळे म्हणतात, मला काहीतरी होत. पण मला वाटत मला काहीच होत नाही.
     माझ्या भोवतालच्या वस्तूंनाच काहीतरी होत.
     माझ्या खोलीतल्या वस्तू एकदम माझ्या विरुद्ध उभ्या ठाकतात.
     जोरजोरात अंगावर येतात. मी जीवाच्या आकांतान ओरडते.
    ओरडू नको तर काय करू मी ?
     सगळे शत्रू झालेत माझे ? कुणीच माझ नाही.
     मग मला वाटत आई बाबा माझे आहेत !
     मग का नाही थोपवून धरत ते माझ्या शत्रूंना ?
     ते दोघही माझ्या शत्रूंना सामील झाले असावेत ?
      पण नाही बाबा तसे नाहीत !
     माझ्या कवितेला बक्षीस मिळाल तेव्हा किती आनंदले होते बाबा !
      इतका आनंद तर त्यालाही झाला नव्हता ! 
      आई किती काळजी करते माझ्या लग्नाची ? 
      आणि मी हि अशी ! 
       कोण करील माझ्याशी लग्न ? 
       तो तर निघून गेला तिच्या सोबत,
       ती श्रीमंत आहे खूप ! …… मी गरीब ! 
       आई रडते बर्याचदा , बाबाही रडत असावेत ? पण  नाहीत रडतांना कधिच. 
       मला बर वाटाव म्हणून ते मांत्रिक आणतात.
       काळाडोंब ! कोळश्याच्या चिखलातून निघाल्या सारखा ! 
       तो धूर करतो खोलीभर, काहीतरी बडबडतो वेड्या सारखा. 
        मला विचारतो, बोल कोण आहेस तू ? 
        मी स्वत:लाच विचारते, कोण मी ?
        कवयत्री ?…… प्रेयसी ? ……. ? गुलाबाच फुल ? ……कि वेडी ?
        उत्तरं खूप असतात. म्हणून मी गप्प. 
        तो खडसावून विचारतो, काय हवय  तुला ? 
        मी म्हणते सुगंध ! मी असं का म्हणते नाही उमगत ! 
        कसला ? तो विचारतो. 
        मी म्हणते फुलांचा …… किंवा कवितांचा …… नाही शब्दांचा ! 
        तो पाणी मारतो सपासप माझ्या चेहऱ्यावर, 
        बर्फाच्या खड्यांसारखे ते थेंब थंडगार चटके देतात कातडीला. 
        धुरावर घट्ट धरून ठेवतो तो माझं तोंड. किती क्कीती छ ळतो मला,
        अगदी त्याच्याच सारखं. 
        मी रडते केविलवाणी ! 
        तो मांत्रिक जातो केव्हातरी, …………. 
        पण तो मांत्रिक मला पुन्हा दिसू लागतो, टेबलाच्या खाली, अगदी कोपऱ्यात. 
        तो अलगद येतो. मोठा होतो, त्याचा रंग गोरागोरा होतो. 
        तो सुंदर दिसू लागतो. कुरळ्या केसांचा, तरुण …अगदी त्याच्याच सारखा ! 
        नाही …… तोच !
        तो मुठी भरभरून पैसे उधळतो माझ्या अंगावर,
        म्हणतो, तुझ्या कवितेतल्या फुलांना छानसा सुगंध असतो.
        हि घे त्या सुगंधाची किंमत ! 
        माझ्या हृदयातले शब्द आतून जातात. 
        कोरड शुष्क होवून जात हृदय माझं ! 
         शब्द नाहीतच मग सुगंध येणार कसा ? 
         ……………………. नको रे नको असे पैसे फेकू ! 
        मी विनवते त्याला, तो ऐकत नाही. 
        त्याची श्रीमंती त्याला ऐकूच देत नाही. तो गुलाम झालाय तिचा. 
       मग फक्त आसवांचा पूर ! 
       तो त्या श्रीमंती सोबत दूर देशी निघून गेलेला. 
       आता येणार नाही तो ! तो नाही मग शब्द कसे येतील ? 
       शब्दच नाहीत मग कविता होईल कशी ? सुगंध कसा येईल ? 
       तो म्हणायचा, तुझ्या कवितांना सुगंध आहे, भास होता तो. 
       पण तो म्हणायचा तेव्हा केव्हढ सत्य होत ते ! 
       नाही आजही तेच सत्य आहे. 
       मला कविता  करायची आहे. त्या कविताचा सुगंध दरवळेल ………………. 
       त्या सुगंधाचा मागोवा घेत घेत येईल तो, त्याची श्रीमंती तिथेच सोडून.
       माझ्या कवितेत आहे सामर्थ्य ! 
       पण ------ पण शब्दांच काय ? ते तर अर्थहिन झालेत, 
       हसताहेत नुसते, मला हिनवताहेत,    माझेच शब्द. 
       माझ्या बक्षीस मिळवणाऱ्या कवितेतून बाहेर पडलेयत ते डायव्होर्स दिल्यासारखे. 
       काय कराव मी ?……………… मला काहीतरी केल पाहिजे ? 
       निदान माझ्या कवितांना तरी वाचवलं पाहिजे.  
       त्यातली फुल जळायला नकोत. 
      माझ्या आतमध्ये एक युद्ध होत घनघोर ! माझ्याच शब्दांशी ! 
       ते शब्द रक्त बंबाळ करतात मला ! मी मरून पडते !
       माझी अंतयात्रा नेतात शब्द. 
      आणि जाळतात मला ! ……………आणि मग श्रद्धांजली ! 
      माझ्याच कवितेच्या दोन ओळी शिपाडतात माझ्या वर !
      माझ्या अंतयात्रेला ही येत नाही तो ! 
     माझा आत्मा थांबलाय भुताटकी सारखा, त्याची वात पाहत. 
     लिहितांना अडखळते मी, माझ्या लक्षात येत, माझा हात लिहितोय. 
      म्हणजे मी जीवंत आहे.  जीवंतपणाची ही जाणीव जास्त भयावह असते. 
अनु वाचत जाते. सगळ, याहीपेक्षा खूप असच, बरचस …………… 
शेवटी एक ओळ असते. 
  "मी जे काही लिहिलंय ते सत्य आहे असं लिहितांना मला वाटत, 
     ................. पण नंतर वाटत की मला जे वाटत त्यातलं ह्यात काहीच नाही."